छत्रपती शाहू आणि औरंगजेब


छत्रपती शाहू आणि औरंगजेब 


                          शाहू नावाचा निर्माता म्हणजे औरंगजेब

 16-05-2015 09:17:10 PM
A- A A+




                   ३ एप्रिल १६८०. छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर औरंगजेबाने दक्षिणेत येण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १६८२ ते १७०७ म्हणजे स्वत:च्या मृत्यूपर्यंत तो दक्षिण प्रांतात तळ ठोकून राहिला. या दरम्यान सतत ९ वर्षे मोगलांच्या फौजेला टक्कर देत छत्रपती संभाजीराजांनी हौतात्म्य पत्करले. राजांची क्रूरपणे हत्या केल्यानंतर झुल्फिकार खानाने रायगडाला वेढा घातला आणि त्याने संभाजीराजांच्या पत्नी महाराणी येसूबार्इंना त्यांच्या ७ वर्षाच्या मुलासह कैद करून औरंगजेबापुढे हजर केले. मुलाचे नाव विचारताच त्याने सांगितले शिवाजी! शिवाजी नावाचा पराक्रम त्याच्या डोक्यात भरलेला असल्याने बादशहाने म्हटले, ‘तू शिवा नही, सच्चा सावा है।’ साव म्हणजे साधू। सावापासून मराठ्यांना एक नवीन नाव मिळाले शाहू। 
                 १८ मे १६८२ ला छत्रपती संभाजी व येसूबार्इंना पुत्र झाला. याच वेळी औरंगजेबाची ५ लाखांची फौज स्वराज्याचे लचके तोडत फिरत असल्याने राजांना आपल्या मुलाकडे पाहण्यास वेळच नव्हता. तशातच ७-८ वर्षे निघून गेली आणि बापाचे छत्र हरवलेले हे पोर बादशहाच्या कैदेत अडकले. ते पण नवीन नाव घेऊन. औरंगजेबाने त्यांचे नाव शिवाऐवजी सावा केले आणि तेच पुढे रूढ होऊन शाहू म्हणून परिचित झाले. 
                      शाहू आणि औरंगजेब यांच्या संबंधाचा आढावा घेतल्यास ज्या माणसाला खलनायक म्हणून शिव्या घातल्या जातात, त्या औरंगजेबाच्या माणुसकीचा एक अद्भूत चेहरा या ठिकाणी पाहण्यास मिळतो. कुणी काही म्हणो परंतु मी एक माणूस म्हणून या ठिकाणी त्याच्या माणुसकीला सलाम करतो. कारण त्याने आपला सख्खा भाऊ दाराची हत्या केल्यानंतर भावाच्या पत्नीला आपल्या जनानखान्यात घातले. तोच बादशहा संभाजीसारख्या भयंकर शत्रूच्या पत्नीची व त्याच्या मुलाची विशेष व्यवस्था ठेवून त्यांचा योग्य तो सन्मान करतो. याला काय म्हणावे? खरं तर त्याच्या कैदेत कोण होतं माहीत आहे का? शिवरायांच्या एक पत्नी सकवारबाई, महाराणी येसूबाई, राजारामाच्या दोन मुलींसह २५ जणांचा ताफा होता.धार्मिक बाबींबरोबरच राजकीय पटलावरही औरंगजेब म्हणजे एक गूढ आहे. वडिलांना कैदेत टाकून हाल-हाल करून मारले. स्वत:च्या मुलीचे विवाह केले नाहीत. जिथे स्वत:च्या मुलाला खेळवलं नाही, तिथे नातवांचा लाड करण्याचा प्रश्नच नव्हता. याच वेळी औरंगजेबाच्या अंगा खांद्यावर खेळणारा एकमेव बालक असेल, तो म्हणजे छत्रपती शाहू. शत्रूचे पोर म्हणजे नागाचं पिल्लू म्हटलं जातं. इथं तर उलट घडलं. शाहूराजांना बादशहाने ७ हजारांची 
मनसब, राजा ही पदवी, खिलतीची वस्त्रे, रत्नजडित खंजीर, घोडा, हत्ती, ध्वज, नगारा आणि नौबतीचा मान दिला. संभाजीराजांचे धाकटे भाऊ मदनसिंग व माधोसिंग यांचा पण सन्मान केला. राजांना आपल्या आईसमवेत राहण्याची परवानगी दिली. नोकरचाकर कायम ठेवून त्यांना वार्षिक तनखा सरकारी खजिन्यातून देण्याची व्यवस्था केली. कैदेतील मराठ्यांचा काफिला बादशहाने आपला वजीर असदखानाच्या तळाजवळच ठेवला होता. स्वत:च्या बापाला नरक यातना देणारा, भावांची क्रूर हत्या करून त्यांच्या बायकांशी विवाह करणारा, दररोज कित्येक हिंदूंचे धर्मांतर करणारा औरंगजेब मराठ्यांशी नैतिकतेच्या बाबतीत एवढा सहनशील का वागला असावा? हे न सुटणारे कोडे म्हणावे लागेल. कारण एक तर कैदेत असूनही त्याने येसूबाई व त्यांच्यासोबतच्या लोकांना पूर्णपणे धार्मिक स्वातंत्र्य दिले होते. एवढेच नाही, तर मराठ्यांच्या तंबूकडे जाण्याची सर्वांना मनाई करण्यात आली होती. चुकून एक वेळा एक सैनिक तिकडे फिरताना पहारेक-यांना आढळला, तेव्हा बादशहाने त्याचे डोळे काढण्याची शिक्षा दिली. शाहूचा एवढा लळा लागला की, त्यांची नातवंडं त्यांच्या अंगाखांद्यावर खेळली नसतील, परंतु शाहूने रोजच त्याच्या दरबारात यावे, असा हुकूम होता. 
असेच एकदा बाल शाहू औरंगजेबाच्या दरबारात गेले असता शाहूच्या गालावर पांढरे चट्टे दिसले. तेव्हा बादशहाने आपल्या हकिमाला बोलावून याचे कारण विचारले. तेव्हा हकिमाने त्यांना सांगितले की, राजांना गोड खाण्याची फार सवय असून त्यामुळे जंत वगैरे झाले असतील. हे ऐकून बादशहाने आदेश दिला की शाहूराजांवर योग्य तो इलाज करून उद्यापासून त्यांना माझा आहार देत जा. औरंगजेबाचा आहार म्हणजे सकाळी सुकामेवा तर जेवणानंतर जगातील ज्या भागात पिकत असतील, ती फळं होती. औरंगजेब २५-२६ वर्षे दक्षिणेत राहिला. परंतु कायमस्वरूपी त्याने गंगेचे पाणी घेतले. त्यासाठी शेकडो उंटांवर पाणी आणण्याची व्यवस्था केलेली होती. शत्रूच्या मुलाची ही बडदास्त याला नेमके काय म्हणावे? बादशहा औरंगजेब हा दक्षिणेत काही पर्यटनासाठी आलेला नव्हता, तर तो मराठ्यांशी युद्ध खेळण्यासाठी आला होता. साहजीकच २५ वर्षांत मोगलांची छावणी दक्षिणेत फिरली, तेव्हा मराठ्यांचा काफिला त्यांच्यासोबत चालत राहिला. संभाजीराजांनंतर राजाराम महाराजांनी जिंजीतून स्वराज्याचा गाडा हाकला. एवढेच नव्हे तर संताजी घोरपडे, हिंमतबहाद्दर उदाजी चव्हाण यासारख्या १०-२० मावळ्यांनी औरंगजेबाच्या तंबूवरच हल्ला केला. औरंगजेब जागेवर नसल्याने वाचला. परंतु मराठ्यांनी त्यांच्या तंबूची कनात कापून सोन्याचा कळस कापून नेला. खरं तर यामुळे मोगलांना प्रचंड आवाहन मिळाले होते. तरीसुद्धा औरंगजेबाचा संयम ढळला नाही. त्यातच बाहेरच्या बाजूने संताजी-धनाजीने बादशहाची झोप उडवली होती. एका बाजूला मराठ्यांच्या विरोधातील लढाई आणि त्याच वेळी स्वराज्याचा राजपुत्र आपल्या कैदेत असताना त्याची मेहमाननवाजी हा निश्चितच संशोधनाचा विषय आहे. 
                    हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही, तर १८ वर्षाच्या कैदेत शाहूची दोन लग्ने बादशहाच्या कैदेत झाली. तीही हिंदू पद्धतीने आणि रुस्तुमराव जाधवरावासारख्या राजघराण्यात. दुर्दैवाने शाहूराजांना हातात तलवार घेण्याची वेळच मिळाली नाही. परंतु राजकारणातील व्यवहारचातुर्य त्यांना औरंगजेबाच्या सोबत राहून जवळून पाहता आले. याचा फायदा पुढे राज्यकारभार करताना त्यांना झाला. पाहता-पाहता शाहूच्या कैदेला १८ वर्षांचा कालावधी उलटला, तर औरंगजेबाला दक्षिणेत येऊन २५ वर्षे झाली होती. वेळ कुणासाठी थांबत नसतो. त्यानुसार बादशहा पण आता म्हातारा झाला होता. मराठ्यांच्या चिवट झुंजीमुळे ते बुडविण्यात बादशहाला अपयश आले. वय आणि परिस्थिती साथ देत नसल्याने बादशहाने महाराष्ट्रातून काढता पाय घेतला. परतीच्या प्रवासात असताना २१ फेब्रुवारी १७०७ रोजी औरंगजेबाने नगर मुक्कामी अखेरचा श्वास घेतला. शाहूराजांवर Ÿफक्त बादशहाची मर्जी नव्हती, तर त्याची मोठी मुलगी झिनतुन्निस्सा बेगमनेही शाहूला मोठा लळा लावलेला होता. त्यामुळे शाहूला मोठा दिलासा मिळाला होता. औरंगजेबाने एकदा शाहू महाराजांना मुस्लिम धर्म स्वीकारण्याची गळ घातली. तेव्हा मराठ्यांच्या छावणीत एकच हाहाकार उडाला. अशा कठीण प्रसंगी बादशहाची मुलगी धावून आली. शाहूच्या बदल्यात मराठ्यांच्या दोन सरदारांनी धर्मांतर करावे, अशी अट घालण्यात आली. त्यामुळे प्रतापराव गुजरांची दोन मुले खंडेराव आणि जगजीवन यांनी धर्मांतर केले. साहजिकच औरंगजेबाने अशा अनेक गोष्टींकडे डोळेझाक केली. त्यामागे काही राजकीय भाग असला तरी शाहूंविषयी वाटणारा जिव्हाळाही महत्त्वाचा होता. 
                          औरंगजेबाच्या निधनानंतर झिनतच्या मध्यस्थीने ८ मे १७०७ रोजी माळव्यातून शाहूंची सुटका करण्यात आली. अंतस्तपणे अनेक छोटे-मोठे सरदार शाहूंनी अगोदरच आपल्याकडे वळविल्याने शाहूंनी महाराष्ट्रात येऊन सातारा या ठिकाणी आपली गादी निर्माण केली. मागे सांगितल्याप्रमाणे हातात तलवार न घेताही त्यांनी शिवरायांचे स्वराज्य मोठ्या चतुराईने वाढविले. बाळाजी विश्वनाथ, पहिले बाजीराव, नानासाहेब पेशव्यांसारखी चतुर माणसे त्यांनीच पुढे आणली. एकंदरच त्यांच्यावर मोगली रीतीरिवाजाचा पगडा होता. म्हणूनच पशू-पक्षी पाळण्याचा त्यांना विशेष शौक होता. राहणी मात्र अतिशय साधी होती. शाहू म्हटले की आपण कोल्हापूरच्या राजर्षि शाहूंचे नाव घेतो. मात्र, संभाजी पुत्र छत्रपती शाहूंचे कार्य त्यांच्यापेक्षा निश्चितच वेगळे आहे. शिवाजी, संभाजी, राजाराम यांचे एकामागून एक असे निधन झाल्यानंतर शाहूंनी स्वराज्याचा कारभार ४० वर्षे हाकला.