माने घराण्याचा इतिहास
माने घराण्याचा संक्षिप्त इतिहास प्रा. डॉ. सतीश कदम महाराष्ट्रात जी काही नामांकित लढवय्यी घराणी झाली त्यात माने घराण्याचा समावेश असून राष्ट्रकूटांचे वंशज असणाऱ्या मानेंचे गरुड हे देवक असून माण देशाचे नेतृत्व करणाऱ्या राजाला माने हे नाव मिळाले असावे. सिद्धनाथाच्या वास्तव्याने पावन झालेल्या म्हसवड नगरीतून माने घराण्याच्या पराक्रमाला सुरुवात झाली असून बहमनी कालखंडात पाठकोजी हे माने घराण्याचे मूळ पुरुष असून ते देशमुखी वतनदार होते. त्यांचे पुत्र सिदोजी माने हे इब्राहीम आदिलशाहच्या कालखंडात मोठ्या हुद्यावर पोहोचले. सिध्दनाथाला कुलदैवत मानणाऱ्या सिदोजीसोबत नेहमी देवाच्या पादुका आणि बटवा असायचा. सिदोजीला चिलोजी आणि नरसिंहराव ही दोन मुले तर नरसिंहरावाला सिदोजी, चिमोजी, अग्नोजी, खेत्रोजी आणि रथाजी असे पाचपुत्र असून यातील रथाजीची कारकीर्द फारच गाजली. रतोजीला नागोजी नावाचा मुलगा असून मिर्झाराजे जयसिंगाच्या स्वारीच्यावेळी ते मोगलाकडे गेले, तेव्हा औरंगजेबाने त्यांना राजे हा किताब आणि म्हसवड, दहीगाव, अकलूज, भाळवणी, कासेगाव, ब्रम्हपुरी, सांगोले, आटपाडी, नाझरे, वेळापूऱ, कण्हेर, हिंगणी, गरवाद गावच्य...