भारत आणि जपानमधील आडनावाचे टप्पे

 

भारत आणि जपानमधील आडनावाचे टप्पे 

विश्वकोशातील व्याख्येनुसार आडनाव शब्दाचा अर्थ उपनाम किंवा अधिकनाम असून त्याची उत्पत्ति अर्ध या संस्कृत शब्दापासून झालेली असून अर्धचे अपभृष्ट रुप आड असा होतो. तर काहींच्यामते अड्ड या कन्नड शब्दावरून आड शब्द आलेला असून ज्याच्या आश्रयाने आपण वावरतो त्याचे नाव म्हणजे आडनाव. त्यामुळे आडनाव म्हणजे उपनाम किंवा आध्यनाव असे असल्याने ते आध्य अर्थातच अगोदरचे किंवा सुरुवातीचे असे असलेतरी ते शेवटी वापरले जाते. एखाद्या व्यक्ति किंवा कुटुंबाचा अचूक निर्देश व्हावा म्हणून आडनाव लावण्याची प्रथा प्रचलित झालेली असावी. त्यामुळे ज्याच्या आश्रयाने आपण जन्मलो किंवा वाढलो त्याचे नाव म्हणजे आडनाव. मध्ययुगात आडनावे लावली जात नव्हती असे म्हणणे चुकीचे असून खरंतर त्याची गरजच नव्हती. विशेषत: कनिष्ठ वर्गाला जमीन ना जुमला इतर कुठल्याही संधी नसल्याने स्वातंत्र्यपूर्व कालखंडात मागासवर्गात आडनावाऐवजी जात लावली जायची. राजर्षी शाहू सारख्या पुरोगाम्यांनी अशा वर्गाला घाडगे नाव दिले. त्यामुळे पारधी समाजात भोसले, पवार, काळे यासारखी आडनावे मोठ्या प्रमाणावर दिसतात.

काही अपवाद सोडले तर आडनावाला मोठा इतिहास असून बरीच आडनावे जातीवाचक, निंदाजनक असून तामिळनाडूमध्ये यावर मोठे आंदोलन झालेले आहे. 1970 साली जयप्रकाश नारायण यांनी जातीवाचक आडनाव बदलाचा कार्यक्रम घेतला तेव्हा त्यात 50 हजार लोकांनी सहभाग नोंदविला होता. आडनाव कसेही असो ज्याचा त्याला गर्व असतो, त्यानुसार 16 नोव्हेंबर 2012 साली शहापटेल आडनावबंधूंनी एकत्र येऊन जागतिक विक्रम केलेला आहे. आडनावाच्या अभ्यासाची व्याप्ती एवढी मोठी आहे की, मराठीतील अ पासून ज्ञ पर्यंत आद्यक्षराने सुरु होणारी आडनावे असून अगदी माणसाच्या केसापासून केसकर ते पायापर्यंत म्हणजे पावले किंवा नखाते अशी त्याची व्याप्ती असून आडनावाने प्राणी, पक्षी, पद, व्यवसाय, जातच कायतर माणसाचे अवयव सोडलेले नाहीत. सन 1665 मध्ये महालिंगम कवीने जैसे स्थानी बसले I तेची आडनाव पावले ll असे म्हटलेले असलेतरी आडनावाचा सखोल अभ्यास केल्यानंतर तामिळनाडू आणि केरळमध्ये आडनावाऐवजी एन. गोपालस्वामी वगैरे याप्रमाणे वडिलांचे नाव किंवा त्याचे अद्याक्षर लावतात. मराठीत शेवटी कर तर तेलगूत वार लावले जाते. उदा. मराठीत तेंडुलकर, मांजरेकर, दारफळकर. याप्रमाणे तेलगूत तोटावार, बोंगीरवार. इतिहासकार वि. का. राजवाडेच्या मते ब्राम्हणवर्गातील बरीच आडनावे ही गोत्रावरून पडलेली आहेत. उदा. फान्टा वरून फाटक, कौरव्य: वरुन कर्वे. मुंबईच्या गजानन वामनचार्य यांच्याकडे साठ हजार आडनावांचा संग्रह असून नागपूरच्या रामगोपाल सोनी यांनी दहा हजार आडनावावर पीएच. डी. केलेली आहे. तर डॉ. सतीश कदम यांनी साडेतीन हजार आडनावाचे वंश, गोत्र, देवक, कुलदैवत, प्रथा परंपरा यावर आधारित 96 कुळाचा इतिहास नावाचे पुस्तक लिहिलेले आहे.

आडनाव अभ्यासाचा विषय असलातरी त्यावेळी खूप गमतीजमतीही होतात. उदा. उन्हाळे पावसाळे, चाटे हागवणे, लिंगे पिसाट, शेंबडे पाटील, हागरे गुंड, लाखे घरबुडवे, हांडगे बुळे अशी आडनावे एकत्र आलीतर वेगळाच अर्थ निघतो. हा विनोदाचा विषय सोडलातर शिवरायांचे वंशज कोल्हापूरचे राजघराणे छ्त्रपती हे आडनाव लावतात. हा झाला भारतीय आडनावाचा आढावा.    

 

आता आडनावाबाबत जपान देशाचा आढावा घेताना अनेक नवीन माहिती समोर येते. त्यानुसार जपान म्हणजे उगवता सूर्याचा देश ज्याला निहोन म्हटले जाते. जपान 6852 बेटांचा एक समूह असून त्यातील होन्शू, क्युशू, शिकोकू आणि होक्कायडो या चार बेटावरच संपूर्ण देश उभा आहे. जपान्यात देशप्रेम ओतप्रोत भरलेले असून आपल्या मानसिक स्वास्थामुळे शंभरी पार केलेले लाखो लोक रस्त्यावर दिसतील. जपानचे अस्तित्व प्राचीन असून 19 व्या शतकापर्यंत तेथे फक्त उच्च वर्ग म्हणजे सामोराईलाच फुजिवारा, कोनोई, मिनामोटो, नैरा, होजयो यासारखी ठरलेली आडनावे होती. मेईजी क्रांतीनंतर 1875 ला जपान सरकारने सरसकट आडनाव धारण करण्याचा अधिकार दिल्याने लोकामध्ये समाधान वाटले. आता अचानक कुठले आडनाव स्वीकारायचे याचा संभ्रम निर्माण होऊन आयत्यावेळी त्यांनी गाव, नद्या, झाडे, पर्वत, शेतावर आधारित आडनावाचा स्वीकार केला. वाहन क्षेत्रातील अग्रगण्य  आडनावे पाहिल्यास  टोयाटा म्हणजे समृद्ध भात शेती, सुझुकी म्हणजे बेलाचे (घंटीचे ) झाड. याप्रमाणे सर्वसामान्यांनीही आडनावे धारण केली.

विद्येची देवता म्हणून बेंझाइटेनला पूजले जात असून देशात कुठलेही पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर ते टोकियोच्या मध्यवर्ती ग्रंथालयात पाठवावेच लागते. त्यामुळे देशभर ज्ञानाचे आदानप्रदान होऊन लिहिण्याकरिता हिरगन, कटकन आणि कांजीसारख्या चित्रलिपीचा वापर होतो. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत कुठलीही परिक्षा नाही, शिक्षक आणि विद्यार्थी मिळून शाळा स्वच्छ ठेवतात, वयाच्या 30 व्यावर्षी लग्न आणि स्त्री पुरुष भेदभाव नसलातरी 1898 च्या एका नागरी कायद्यानुसार लग्न झाल्यानंतर जोडप्याला दोंघाचे आडनाव एकच ठेवावे असा सक्तीचा कायदा आहे. त्यात दोघापैकी एक असा पर्याय असलातरी पुरुषप्रधान संस्कृतीमुळे 99% मुलींना नवर्‍याचे नाव स्वीकारावे लागते.संपूर्ण देशामध्ये आपल्या कुळाची वंशावळ ( कोसेकी ) गाव पातळीवर सरकारी यंत्रणा जतन करुन ठेवते. त्यामुळे आपल्यासारखे अचानक दोनचार पिढीनंतर उठून शोधाशोध करायची गरज नाही. वडिलांच्या नंतर कुटुंबातील थोरल्या मुलाच्या नावाने वंशवेल पुढे दाखविला जातो.

आपल्याप्रमाणेच आडनावाला अर्थ असून अकामी म्हणजे लाल झाड, अमानो म्हणजे स्वर्गीय क्षेत्र, सातो म्हणजे मदतनीस, तनाका म्हणजे भाताचे शेत, आकियामा म्हणजे शरद ऋतु, अबे म्हणजे अनेकवेळा शांतता ( राष्ट्रपती सिंजो अबे), ऐकावा म्हणजे नदीबद्दल सहानुभूती, होंडा म्हणजे जमिनीवर घट्ट असणारा, नाकाजिमा म्हणजे आतील बेट, सुझुकी म्हणजे घंट्याचे लाकूड, मदा म्हणजे समोरचा तांदूळ, कोबायाशी म्हणजे लहान जंगल, नाकामुरा म्हणजे मध्यवर्ती गाव. याप्रमाणे जपानमधील आडनावात भातशेतीचा सर्वात जास्त वापर केलेला आढळून येतो. शिंद, कोंडो, किटो, इटो यासारखी आडनावे मराठी धाटणीची वाटत असलीतरी त्याचा उच्चार आणि अर्थ यात खूप फरक आहे. तेथे आडनाव प्रथम लावण्याची पद्धत मोठ्या प्रमाणावर प्रचलित असून राव किंवा ताई प्रमाणे मुलाच्या नावापुढे  कुन किंवा सान तर मुलींना चान लावतात. उदा. तारोकुन, हितोमीचान. तर पूर्ण नाव मिनाको एलेन मास्तुनो याप्रमाणे लिहिले जाते. आपल्याप्रमाणेच जवळचा असेल तरच नावाने हाक मारतात अन्यथा आडनावाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. मुलींचे आडनाव बदलल्याने तिच्या मुळ नावाचे अस्तित्व धोक्यात असूनही कोर्ट सुद्धा एकाच आडनावावर अडून बसल्याने सध्यातरी सर्व काही अलबेल म्हणजे जपानीत आरेबर आहे. यावरून भारतीय आडनावे ही परिस्थितीनुसार लावली गेली तर जपानमध्ये ती स्वीकारावी लागली हा महत्वाचा भाग आहे. यासोबतच तेथील बहुंताश आडनावे ही भातशेतीवर ठेवलेली असून पती किंवा पत्नीला कागदोपत्री एकच आडनाव धारण करावे लागते हा फरक सोडला तर माणसाला फक्त नाव असून भागात नाही तर कुळाचे म्हणजे आडनाव लागले तरच तो समाजात वावरण्यास लायक होतो हेच खरे !    

 


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कदम कुळाचा इतिहास

माने घराण्याचा इतिहास