बौद्ध आणि मुस्लिम राष्ट्रातील
रामायण
भारतच
नाहीतर आशिया खंडातील अनेक देशात हजारो वर्षापासून रामायण हे महाकाव्य राष्ट्रीय
ग्रंथाच्या स्वरुपात पूजले जाते. दळणवळणातील क्रांतीमुळे हजारो वर्षाचा इतिहास सहजपणे
उलगडणे शक्य झाल्यामुळे नेपाळपासून ते इंडोनेशियापर्यंतचा श्रीरामचरित्राचा प्रवास
आश्चर्यकारक आहे. वाल्मिकीनी इसवी सनपूर्व 600 वर्षापुर्वी लिहिलेल्या वाल्मिकी
रामायणाला प्राथमिक दर्जा असून त्यात 7 अध्याय व 24000 श्लोकात आदर्श संस्कृतीचे चित्रण आहे. जगण्याचा आदर्श मार्ग म्हणून
याकडे पहिल्याने रामायणासारख्या महाकाव्याला
प्रत्येकाने आपल्या परीने लिहिले. केवळ भारतात 300 पेक्षा अधिक रामायणाचे प्रकार
असून तुलसीदासचे रामचरितमानस नंतर तमिळमधील कम्बरामायण,
केरळमधील रामचरितम, तेलगूमधील रंगनाथ रामायण, कर्नाटक पम्प रामायण, गुजरात गिरधर रामायण, उडीशा कृत रामायण, आसाम माधव कंदली रामायण, बंगाल कृत्तिवास रामायण, मराठीतील भावार्थ रामायण
तर उर्दूमधील चक्रबस्त रामायण प्रसिद्ध आहेत. याशिवाय अकबराने 16 व्या शतकात बदायुनीकडून रामायणाचे फारसीमध्ये भाषांतर करून घेतले होते.
रामायणाचा
अभ्यास करताना दिसून येते की, रामायण फक्त
भारतातच नाहीतर जगातील अनेक देशात प्रचलित आहे. खासकरुन आग्नेय आशियायातील लोकांचा
धर्म एकतर बौद्ध किंवा मुस्लिम असूनही रामायण हे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग
राहिलेला आहे. त्यामुळे बर्मा किंवा म्यानमारमध्ये रामवथ्यु,
थायलंडमध्ये रामकियन, मलेशियामध्ये हिकायत सेरीराम, कंबोडिया मध्ये रामकेर्ती, लाओसमध्ये फ्रा लाक फ्रा
लाम, श्रीलंकेमध्ये जानकी हरणम,
इंडोनेशियातील बाली बेटावर रामकवच, जावा बेटावर काकावीन आणि
सुमात्रा बेटावर रामायण स्वर्णद्वीप, नेपाळमध्ये भानुभक्त
रामायण या नावाने रामायण प्रसिद्ध असून हजारो वर्षापासून प्रचलित आहे. आग्न्येय
आशियातील देशांची प्राचीन नावे रामायण प्रभावित असल्याने म्यानमारचे जुने नाव
ब्रम्हदेश, थाईलंडला थाई देश,
मलेशियाला मलय देश, कंबोडियाला कंबोज,
लाओसला लवदेश, श्रीलंकेला सिलोन याप्रमाणे असून या परिसराला
हिंदोशिया किंवा सुवर्ण द्वीप म्हटले जायचे. ख्रिस्तपूर्व कालखंडात भारतातील कलिंग
( ओरिसा ) देशातून हजारो हिंदू व्यापाराकरिता प्रथम जावा बेटावर गेले. तेथील
आदिवासीवर विजय मिळवून त्या देशावर आपले राज्य निर्माण केले. पुढे या देशांचा धर्म
बौद्ध किंवा मुस्लिम राहिलातरी त्यांनी रामायणाच्या स्मृती जागृत ठेवल्या.
त्यामुळेच
थायलंड चा राष्ट्रीय धर्म बौद्ध असूनही त्यांचा राष्ट्रीय ग्रंथ रामायण आहे.
याशिवाय तेथील राजा स्वत:ला रामाचा अवतार मानत असल्याने भरताच्या प्रतिकात्मक
पादुका ठेवून कारभार करत असून सध्या दहावे राम तेथील राष्ट्राध्यक्ष आहेत. एवढेच
नाहीतर बँकॉकमधील मुख्य रस्त्याला आठवा राम,
दहावा राम याप्रमाणे नावे दिलेली आहेत. खरी गंमत म्हणजे ज्या ज्या देशात रामायणाचा
प्रभाव आहे त्यांना श्रीराम हे आपल्याच देशात जन्माला आलेले आहेत यावर ठाम विश्वास
आहे. त्यानुसार थाईलंडमध्येही प्रत्यक्षात अयोध्या नगरी असून तिला आयुधया नाव आहे.
इसवी सन 1612 पर्यंत सोराई नदीकाठी असणारी आयुथया म्हणजे अयोध्या ही थाईलंडची
राजधानी होती. आजही या गावात त्याचे अवशेष असून
रामायणाचे सर्व उत्सव तेथे साजरे केले जातात. बँकाक हे सध्याच्या राजधानीचे ठिकाण
असून त्याला सुवर्णभूमी आंतरराष्ट्रीय विमानतळ नावतर आहेच याशिवाय विमानतळाबाहेर
भव्य असा समुद्रमंथनाचा देखावा साकारलेला आहे. बौद्ध बहुल राष्ट्रात रामायणाला
किती महत्त्व दिले जाते हे यावरुन दिसून येते. थाईलंडलगत असणार्या कंबोडियावर
ख्मेर वंशाची सत्ता होती. याही देशात बहुसंख्य बौद्ध धर्मीय असूनही प्राचीन
कालखंडापासून याठिकाणी रामायणाचा महिमा गायला जात होता हे दिसून येते. अलीकडे
झालेल्या उत्खननात प्रोमदा नावाच्या गावात इसवी सन 6 व्या शतकातील 6 फुट उंचीची
रामाची धर्नुधारी मूर्ति सापडली आहे. कंबोडियातील रामायण रामकिर्ति नावाने
प्रसिद्ध आहे. कंबोडियासारख्या बौद्ध राष्ट्रात तब्बल 400 एकरात जगातील सर्वात
मोठे विष्णू मंदिर आहे. अलीकडे त्याचे बौद्ध शैलीत रुपांतरीत केलेले असलेतरी
मंदिरावरील हिंदू शैलीतील शिल्पकला तोंडात बोट घालायला लावणारी आहे. विशेष म्हणजे
या मंदिराच्या भिंती 30 – 40 फूट उंचीच्या असून जांभा
दगडातील शिल्पकलेत रामायणातील अनेक प्रसंग कोरुन ठेवलेले आहेत. याशिवाय कंबोडिया
ची राजधानी फोन्फेन येथील मुख्य चौकात 25 फूट उंचीचा गणपतीचा पुतळा आहे. हे लिखाण
करत असताना सांगावसे वाटते की, आग्न्येय आशियातील या पाच
देशांचा दौरा मी बाय रोड केलेला आहे.
व्हिएटनाम
आणि लाओस या चायना पट्ट्यातील राष्ट्रातही रामायणाचे महत्व तेवढेच असून लाओस मध्ये
फ्रा लाक फ्रा लाम नावाने प्रसिद्ध असलेले रामायण 60 ताडपत्रावर लिहिलेले आहे.
लाओसची प्राचीन राजधानी श्री साकेत म्हणजे आयोध्या होती. फ्रा लाक फ्रा लाम
रामायणाचा निर्माता असलेला फुत्थ फोचन हा बौद्ध भिक्षू असून ते 1850 साली लिहिलेले
आहे. तेथे फोम्मचाक नावाचे दुसरे एक रामायण असून फोम्मचाकचा अर्थ होतो ब्रम्हचक्र.
यामध्ये बुद्धाला रामाचा अवतार मानलेले आहे. लाओस देशाचे नावही रामावरुन पडलेले
असून लाव म्हणजे सभ्य आणि लाओस म्हणजे सभ्य माणसाची भूमी. रामायणातील नावात पा लाम
म्हणजे राम, पा लाक म्हणजे लक्ष्मण, हाफनसुआन म्हणजे रावण, हनुमानाला हनुमोन, सीतेला नांगसिडा तर लंकेला लंग्का म्हणतात.
वरील
बौद्ध राष्ट्राबरोबरच इंडोनेशिया आणि म्यानमारसारख्या मुस्लिम राष्ट्रातही प्राचीन
काळापासून रामायण हे आदर्श महाकाव्य आहे. इंडोनेशियात जावा, सुमात्रा, बाली, सेलेबीज
यासारखी 3000 बेटांचा समूह असून मसाल्याच्या व्यापारामुळे तेथे हिंदूंची वस्ती
वाढली. त्यामुळे जावा बेटावर हिंदूचे वर्चस्व राहिले. सोबत रामायण महाभारताचा
आदर्श होता. जावा बेटावरील योगेश्वर कवीने इ. स. 856 ला कावी भाषेत काकावीन रामायण
लिहिले. शैलेन्द्र वंशाच्या बौद्ध राजाने बांधलेल्या पानातारान मंदिराच्या भिंतीवर
रामकथा चित्रित केल्या. याच जावा बेटावर मातरम प्रांतात हजारी देवस्थान असून
त्याठिकाणी एक हजार मंदिराचा समूह आहे. या बेटावरील लोक 2 र्या शतकात बौद्ध झाले
तर पुढे 13 व्या शतकात पुर्णपणे मुस्लिम झाले. वेळोवेळी भलेही धर्मांतर झाले तरी
या बेटाने हिंदुजम सोडले नाही. हीच अवस्था बाली आणि सुमत्रा बेटावरील असून तेथे
श्रीविजय घराण्याची सत्ता होती. योग्या नावाच्या गावाला ते अयोध्या मानतात.
इंडोंनेशिया मुस्लिम कट्टर असलातरी हिंदू मंदिराबरोबरच त्यांच्या संस्कृतीचे
पालनकर्ता आहे. हीच परिस्थिती म्यानमार म्हणजे
पूर्वीचा ब्रम्हदेश किंवा बर्मा असून तेथील राजा अनिरुद्धने बौद्ध धर्म स्वीकारल्याने
हे राष्ट्र बौद्धमय झाले. तेथील नदीचे नाव
इरावती तर अमरपूर, हंसावती, द्वारवती
नावाची शहरे होती. नेपाळमधील जनकपूर हे सीतेचे जन्मस्थान असून तेथील भानुभक्त
रामायण प्रसिद्ध आहे. शेवटी श्रीलंका म्हणजे रावणाचे वसतिस्थान असून त्याचे मूळ
नाव राऊजानेर वरेन्दू नरेंद्र असून लंकेतील जाफना प्रांतात आजही सीतेची वाटिका, हनुमान कुटी इत्यादि पाऊलखुणा दाखविल्या जातात. योगायोगाने एकाच वर्षात
मला नेपाळ आणि लंकेला जाण्याचा योग आला. रामायणाचा महिमा खूप आहे. परंतु
हनुमानाच्या शेपटी प्रमाणे ते लांबेल म्हणून तूर्त जयश्रीराम..