देवक भाग 2

 देवक ( भाग 2 ) प्रा. डॉ. सतीश कदम 9422650044



मागच्या भागात देवक या संकल्पनेची चर्चा केल्यानुसार देवकाशी कुळाचा रक्तसंबंध किंवा काही गूढ ऋणानुबंध 

असावा अशी कल्पना आहे. प्रत्येक कुळाला आपल्या देवकाविषयी आदर व भक्ती असते. ज्या प्राण्याला कुळाने देवक मानले असेल, त्याचे मांस त्या कुळातील माणसे खात नाहीत. एवढेच नव्हेतर त्याला आपल्या उपयोगासाठी राबवूनही घेत नसत. देवक वृक्षाची पाने, फळे, फुले व लाकूड यांचा उपयोग करीत नाहीत. देवक मानलेला प्राणी मरण पावला की, त्याचे सुतक पाळतात. त्याचे कातडे विशेष समारंभात अंगावर घेतात. काही लोक अशा प्राण्याची चित्रे अंगावर गोंदवून घेतात, सर्व देह त्याच्यासारखा रंगवतात. देवकाचे तीन भागात वर्गीकरण करता येईल. 

1.प्राणी देवके- घोडा, गरुड, रेडा, हत्ती, वानर, चितळ, डुक्कर, कासव, कासव, मोर, लांडगा,  बकरा,सांबर 

2. वनस्पती देवके  – आंबा, चिंच, बेल, निंब, बाभूळ, बोर, कदंब, शमी, वड, उंबर इत्यादी 

3. वस्तू देवके – कुर्हातड, फुंकणी, सूरी, चिमटा, तलवार, तेलघाणा, मीठ, भात, लोखंड इत्यादी. 

या अर्थाने कुठल्याही वृक्षाची पुजा केली म्हणजे ते त्याचे देवक होईल. भारतात पुष्कळ लोक पशू, पक्षी, वनस्पती किंवा काही वस्तू यांची पूजा करतात ते त्यांचे देवक असतेच नाही. हिंदू लोक तुळस, वड, नाग, गाय, शस्त्रे यांची पूजा करतात ती त्यांची देवकपूजा नाही. 

       ‘ आदिवासी कौन’ पुस्तकात वेगळेच मत मांडलेले असून त्यानुसार, ‘ भगवान शिवाचे देवक नंदी आहे. कारण संपूर्ण जमिनीचा पालनकर्ता म्हणून बैल त्याचा मुख्य आधार म्हणून नंदी त्याचे देवक असावे. पुढे हनुमान, बाली, सुग्रीव, अंगद यांचे देवक वानर असल्याने त्यांनाही माकड म्हटले असावे. याच पुस्तकात लेखकाने ‘ भारत मे आर्य’ या पुस्तकात रावणाच्या देवकाचा उल्लेख करताना म्हटले आहे की, रावण या शब्दाचा अर्थ होतो, रा = ताड  ( तामिळ शब्द) आणि वन = जंगल. त्यानुसार ताडाच्या जंगलात राहणारा तो रावण. वास्तविक रावण हे त्याचे खरे नाव नसून त्याची उपाधी आहे. रावणाचे मूळ नाव हे “ राऊजानेर वरेन्दू नरेंदर” असे आहे. ताड हे त्याचे देवक असल्याने त्याला रावण हे पडले. त्यामुळे देवक किंवा टोटेम संकल्पना प्राचीन आहे.  भारतात अनार्यात म्हणजे आजचा भारत देश व मुख्यत्वे द्रविड लोकात देवकप्रथा होती असे दिसून येते. वाघ, नाग व वानर या मूळच्या देवकांची देव म्हणून पुजा करणे हा हिंदूंचा प्रभाव आहे. 

एखाद्या मुलाला देवक हे आपल्या आई किंवा बापाकडून मिळते. महाराष्ट्रात ते  बापाकडून मिळते. वैदिक कालखंडापासून हिंदू धर्मात पितृपरंपरा मोठ्या प्रमाणात राहिलेली आहे. तरीपण समाजशास्त्रज्ञांनी मानव समाजाला दोन भागात घातले आहे. 1. पितृसत्ताक 2. मातृसत्ताक 

काही आदिवासी जमाती सोडल्यातर सर्वत्र पितृसत्ताक परिवाराची परंपरा प्रचलित आहे.  देवकाचा विचार केलातर मराठाच नाहीतर अनेक अठरापगड जातीतील लोकांचे देवकही अगदी मराठ्याप्रमाणेच आहेत. देवकपद्धतीच्या धार्मिक आणि सामाजिक प्रकारात विलक्षण संबंध आहे. वंशपरंपरागत चालत आलेल्या आपल्या देवकाचे नाव जर दुसर्या  मनुष्याच्या देवकास असेल तर, त्याच्याशी लग्न करायचे नाही, ही सामाजिक चाल काटेकोरपणे पाळली जाते. शास्त्र प्रगत होण्यापूर्वी एक रक्तगट व त्यातून होणारे दुष्परिणाम वगैरे कल्पना आदिम मानवाने अनुभवातून आत्मसात केलेल्या होत्या हेच यावरून दिसून येते. त्यामुळे  आपले देवक मारायचे नाही किंवा खायचे नाही हे पाळले जाते. त्यातूनच त्याच्याविषयी आदरभाव निर्माण झाला. याच बाबीला धर्माची जोड दिली. त्यामुळे देवक ही संकल्पना शास्त्रावर आधारित आहे हेच यावरून दिसून येते.  

इरावती कर्वे यांनी ‘मराठी लोकांची संस्कृति’ या पुस्तकात देवक आणि त्यानुषंगाने होणारे विवाह याबाबत लिहिले आहे की, “मराठीत पितृकुलाचे नाव लावतात, कानडीमध्ये लग्नाच्या नात्याचे सर्व शब्द रक्ताच्या नातेवाईकांना लावतात. तर उत्तरेत कुलनामाची चाल नाही. त्यामुळे जोपर्यंत नातेवाईकांची आठवण पोहोचते, किमान तिथंपर्यंत पितृकुलात लग्न न करण्याचा नियम पाळतात. शेपाचशे उंबर्या चे गाव असलेतरी एका जातीची एकाच गावातली घरे ही आपल्याच कुळातील मानून गावातल्या गावात मुलगी करत नाहीत. विदर्भातील यदूवंशी गवळी किंवा अहिर गवळी यांच्यातही गावातल्या गावात मुलगी करत नाहीत. गंगेच्या दक्षिणेला देवके संकल्पना प्राचीन काळापासून अस्तित्वात होती. तर पश्चिमेकडे रजपूत, काठी या लोकात कुळे होती. यावरून असे दिसून येते की, देवकाची चाल प्राचीन असून कुळाचे जे देवक होते तेच कूलनाव पडले असावे.  त्यानंतर निरनिराळ्या कारणावरून आडनावे पडली असावीत. 

उत्तर भारतात देवके नाहीत. त्यामुळे पितृ सावर्ण्य ठरविण्याची पद्धत म्हणजे एका गावातील वस्ती. अब्राम्हण्यात देवकाचे जे कार्य तेच ब्राम्हणात  गोत्राचे. उत्तरेत पितृ कुळात तर केरळात मातृकुळात लग्न होत नाही. उत्तरेत सापिंड्याची मर्यादा पाळतात. त्यामुळे मामाची व आत्त्याची मुलगी करत नाहीत. याउलट दक्षिणेत त्यांना भिन्न कुळाचे मानून हे विवाह होतात. साहजिकच कुलाबाहेर किंवा देवकाबाहेर मुलगी देण्याची चाल दक्षिणेकडची व सापिंड्यांची ( आई बापाची मुले ती आपली भावंडे आपलीच भावंडे समजून लग्न न होणे ) चाल उत्तरेकडची आहे. 

आपली मुलगी उच्च कुळात जावी ही प्रत्येकाची भावना, या उलट हुंडा घेऊन खालच्या कुळातील मुलगी करण्याकडे कल दिसतो. जी जात किंवा कुल श्रेष्ठ त्यांच्या मुलीला सुयोग्य वर मिळणे कठीण जाते. म्हणून राजस्थानातील शिसोदिया कुल सर्वश्रेष्ठ असल्याने त्यांना दोन चार कुलाव्यतिरिक्त मुलींचे विवाह करता येत नाहीत म्हणून त्यांच्या अनेक मुली अविवाहित राहतात. तर पंजाबात ही चाल असण्याने उच्च कुळात बहुपत्नीत्व दिसते तर मुलींची संख्या कमी असल्याने त्यांना जबर हुंडा द्यावा लागत असल्याने खालच्या जातीत बहुपतित्व म्हणजे दोन चार भावात मिळून एक बायको असा प्रघात अस्तीत्वात असल्याचे दिसते. मराठ्यांनी आपली संस्कृति जपत दक्षिण आणि उत्तर यांच्यातला मध्य साधला. 

एकंदर अब्राम्हण किंवा क्षत्रियात कुलनामे आणि देवके दोन्ही प्रकार आढळतात. देवक हे त्या कुळाचे चिन्ह आहे. ते पशु, पक्षी, वनस्पती किंवा निर्जीव वस्तूही असू शकते. शक्यतो एकाच आडनावाचे एकच देवक असते. किंबहुना बरीच आडनावे ही देवकावरूनच आलेली आहेत. 

तर काही आडनावे त्या त्या कुळाने तशीच स्वीकारली आहेत. शिलाहार – शेलार, कदंब – कदम, चालुक्य, शिंद – शिंदे. मराठ्यातील काही देवके इतर जातीतही आढळतात. गरुडाचा पंख, डुक्कर, कट्यार, कुर्हाड, पंचपालवी वगैरे. विशेष म्हणजे अशाप्रकारची  देवके तेलगू आणि तामीळ यांच्यातही आढळतात. अनेक संदर्भ ग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर कुठल्याही लेखकाने देवकाच्या उत्पत्तीवर ठामपणे आपले मत मांडल्याचे दिसत नाही. Dr. Satish kadam

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कदम कुळाचा इतिहास

माने घराण्याचा इतिहास