बेलवडीची राणी मल्लमा...
राणी मल्लाम्मावरील स्वारी आणि मराठा सैनिकाची बदनामी
प्रा. डॉ. सतीश कदम
छत्रपती शिवरायांच्या सामाजिक कार्याची नोंद शत्रूंनीसुद्धा चांगल्या शब्दात घेतली आहे. त्यामुळे कुठल्याही इतिहासकाराने त्यांच्यावर कधी कुठला ठपका ठेवला नाही. स्त्रियांप्रती राजांची नीती सर्वश्रुत आहे. कारंजा स्वारीप्रसंगी महिलाच नाहीतर महिलांच्या वेशातील पुरूषांनाही मराठा सैनिकांनी सुखरूपपणे जाऊ दिले होते. कधी कधी अतिशोक्तीच्या नादात आपण काय सांगून जातो याचेही काहींना भान रहात नाही. असाच एक प्रसंग छत्रपती शिवराय आणि बेलवडीची राणी मल्लामा यांच्यातील युद्धाचा असून त्यात मराठ्यांचे सेनानी सखोजी गायकवाड यांनी त्या राणीवर अत्याचार केला असे चुकीचे लेखन आणि कथन केल्याने ही एकप्रकारे मराठा सैनिकाची बदनामी आहे.
हा प्रसंग आहे छत्रपतींच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेचा. शिवराज्याभिषेकानंतर महाराजांनी जानेवारी 1677 ते एप्रिल 1678 या दरम्यान आपली कर्नाटक स्वारी पूर्ण केली. यात महाराजांना अदभुतपूर्व असे यश मिळाले. हैद्राबादचा कुतुबशाहा, जिंजीला असणारे सावत्र भाऊ व्यंकोजी आणि त्या भागातील कित्येक छोटे मोठे संस्थानिक, सरदार, नायक, पाळेगार महाराजांच्या प्रभावाने भारावून गेले होते. त्यामुळे या स्वारीत विजय आणि विजय हेच सूत्र कायम राहिले. जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था पहाण्यासाठी दक्षिणेच्या सुभ्यावर जावई असणारे हरजीराजे महाडीक यांची नियुक्ती केली. सर्वकाही स्थिरस्थावर झाल्यानंतर महाराजांनी म्हैसूर, कोप्पल, हुबळी, गदग, लक्ष्मेश्वर असा परतीचा प्रवास सुरू केला. केवळ महाराजांचे नाव ऐकून अनेकांनी राजांचे स्वामित्व स्वीकारले होते. या दरम्यान फेब्रुवारी 1678 ला राजेंचा मुक्काम बेलवडी संस्थानातील यादवाड या गावी पडला. बेलवडी ते यादवड हे सुमारे अंतर 87 किमीचे आहे.
बेलवडीचा परिसर हा दक्षिण कर्नाटकात मोडतो. आदिलशाहाचा वचक असलातरी बेळगाव ते बेंगलोरदरम्यान पंचवीस एक छोटीमोठी संस्थाने असून त्यांना नायक किंवा पाळेगार म्हटले जायचे. याप्रमाणेच बेलवडी ता. बैलहोंगल जि. बेळगाव येथे ईशप्रभू देसाई हे 360 गावचे छोटे संस्थानिक असून त्यांच्याकडे दहा हजाराची खडी फौज आणि बेलवडीत किल्लेवजा गढी होती. बेलवडीचे संस्थान इतिहासात अजरामर ठरले ते म्हणजे या संस्थानच्या राणी मल्लम्माजी यांनी छ्त्रपती शिवरायांच्या फौजेसोबत लढलेल्या लढाईमुळे.
राणी मल्लम्मा -
सोंडे (स्वादी) संस्थानचे राजे मधुलिंग नायक आणि राणी विरम्माजी यांच्यापोटी श्रावण शुद्ध अष्टमी शके 1580 ( इ.स. 1660 ) रोजी मल्लम्मा यांचा जन्म झाला. मल्लम्माच्या स्वंयवरासाठी ज्याने जास्त वाघाची शिकार केली त्याच्याशी त्यांचा विवाह होणार अशी अट होती. यासाठी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यन्तच्या राजकुमारांनी भाग घेतला असलातरी वयाच्या विसाव्या वर्षी बेलवडीचे राजपुत्र ईशप्रभू देसाई यांनी तब्बल 21 वाघांची शिकार केल्याने त्यांनी हा स्वयंवर जिंकून मल्लम्मासोबत विवाहबद्ध झाले. त्यामुळे सोंडा संस्थानची राजकन्या बेलवडीची महाराणी झाल्या. धनुर्विद्या, घोडेस्वारी यात पारंगत असणार्याक राणीने बेलवडीत आल्यानंतर 2000 महिलांची खडी फौज उभी केली होती. एकंदर ईशप्रभू देसाई आणि राणी मल्लम्मा यांच्या नेतृत्वाखाली बेलवडी संस्थानचा कारभार अतिशय सुरळीत चालू होता.
शिवरायांच्या सैन्याच्या यादवडमधील मुक्काम -
कर्नाटक स्वारीवरुन परत येत असताना राजेंचा मुक्काम यादवड ता. गोकाक जि. बेळगाव याठिकाणी पडल्यानंतर बेलवडीच्या ईशप्रभू देसाईला मोठा आनंद झाला. साक्षात शिवाजीराजे आपल्या प्रदेशात आलेले आहेत म्हटल्यानंतर त्यांचा सन्मान करण्यासाठी राजेंना बेलवडीला बोलविण्याचा बेत आखला गेला. त्याच रात्री मराठ्यांच्या काही सैनिकांनी यादवड परिसरातील गवळ्यांच्या काही पळविल्या. युद्धाची हीच ठिणगी होती. याविषयी मराठी आणि कन्नड अशा दोन्ही साहित्यात परस्परभिन्न असे लिखाण आहे. त्यानुसार कन्नडमधील ‘तुरुकैर पंचमरा इतिहासुवू’ यातील हे वर्णन आहे, तर सभासद, चिटणीस यासारख्या बखरी, वा.सी. बेंद्रे, रियासतकर गो. स. सरदेसाई इत्यादि लेखकांनी आपल्या पुस्तकात बेलवडीच्या सैनिकांनी महाराजांच्या कहीकबाडास (घासदाणा तुकडीस) उपसर्ग दिला असे म्हटले आहे.
‘शिवाजी मल्लम्मा समरोत्सव’ नावाच्या पुस्तकानुसार बेलवडीच्या सैन्याने मराठी सैन्यावर हल्ला करून आपली जनावरे परत नेली. तर आपल्या संपूर्ण स्वारीत भल्याभल्यांनी मराठी सैन्यापुढे नांग्या टाकल्या तेथे हे छोटेसे राज्य थेट आपल्यावर आक्रमण करण्याची हिंमत करतय म्हटल्यावर राजांनी थेट बेलवडीवर आक्रमण करण्याचा आदेश दिला. ईशप्रभुनेही युद्धाची जोरदार केली होती, दादाची ( नेमके नाव नाही ) च्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने बेलवडीवर हल्ला केला. ईशाप्रभूने मराठ्यांना जोरदार टक्कर द्यायला सुरुवात केली. तेवढ्यात अचानकपणे एका मराठी सैनिकाने पाठीमागून ईशप्रभूला भोसकून ठार केले. राजा गेल्याचे पाहताच राणी मल्लम्मा स्वत: युद्धाचा पोषाख करून हातात तलवार घेऊन आपल्या महिला तुकडीसह मैदानात उतरल्या. जवळपास 27 दिवस त्या मराठ्यांशी झुंजल्या. कन्नड साहित्यानुसार राणी मल्लम्मा विजयी झाल्या, तर मराठी साहित्यानुसार मल्लम्मा पराजित होऊन त्यांना कैद करून महाराजापुढे नेण्यात आले. याविषयी कन्नड आणि मराठी साहित्यात परस्पर मत मांडण्यात आलेले आहे. तरीपण राणीने मराठ्यांना जोरदार टक्कर दिली हे सर्वमान्य आहे.
बेलवडी युद्धाचे ऐतिहासिक संदर्भ -
खरंतर बेलवडी लढाईच्या या प्रसंगाचा पहिला उल्लेख इंग्रजांच्या ‘28 फेब्रुवारी 1678 च्या फॅक्टरी रेकॉर्डमध्ये’ असून त्यातील वर्णनानुसार ‘मराठी सैन्याची येथे जी फजिती झाली तशी आदिलशाहा किंवा मोगालाशी लढताना कधी झाली नाही’ असे म्हटलेले आहे. शिवाजी द ग्रेट किंवा छत्रपती शिवाजी या चरित्रामध्ये केळूसकर यांनीपण याचे वर्णन केलेले आहे. तर बखरी तसेच जदुनाथ सरकार यांनी मल्लम्माला सावित्रीबाई देसाईन म्हटले आहे. वास्तविक हे नाव कोठून घेतले याचा संदर्भ दिलेला नाही. कन्नड साहित्यात कुठेही सावित्रीबाई नाव आढळून येत नाही, तसेच शिवरायांनी त्यांना ही पदवी दिली असे जे संगितले जाते, त्याचाही कुठेच उल्लेख सापडत नाही. बेळगाव जिल्हा गॅझेटियरमध्ये त्यांना मल्लव्वा म्हटलेले आहे. खरंतर गॅझेटियर वगैरे अस्सल संदर्भाच्या जवळ जातात. ( Dr. satish kadam )
कन्नड साहित्यात सखोजी गायकवाडचा उल्लेख नाही -
बेलवडीच्या युद्धादरम्यान मराठा सेनापतीने राणीसोबत गैरवर्तन केले असा जो उल्लेख येतो, याचठिकाणी मराठी भाषिकांनी मोठा गोंधळ घातलेला आहे. त्यानुसार ‘तारीख इ शिवाजी’ सारख्या बखरीचा आधार घेत मराठीतील इतर बखरी, ‘शिवाजी अँड हिज टाईम्स’ सारख्या पुस्तकात त्या सैनिकाचे नाव सखोजी गाईकवाड दिलेले असून त्याने एका अबलेसोबत गैरवर्तन केले म्हणून सखोजीचे डोळे काढून त्यांना सौदंत्तीजवळील मनोळीला ठेवण्यात आले असा उल्लेख आहे. तर बाजारू व्याख्यात्यांनी सखोजीला बलत्कारी ठरविले. वास्तविक ‘द रेबिलीअस राणी ऑफ बेलवडी’ किंवा हार्मोल्ड कार्लीच्या ‘बेलवडी मल्लम्मा’ सारख्या इंग्रजी पुस्तकासह सर्वच कन्नड साहित्यात या सैनिकाचे नाव दादाजी रघुनाथ बेडकर दिलेले आहे. तेथे कुठेही सखोजी गायकवाडचा उल्लेखच नाही.
नावाच्या बदलापर्यंत ठीक आहे, परंतु शिवरायांचा सैनिक, शिवरायांच्या स्वारीत शिवराय सोबत असताना बलत्कार करील? याचे भान असले पाहिजे. बहुतेकांनी त्याला डिसऑनर म्हटलेले आहे. अहो मल्लम्मा आदिलशाहीसारख्या बलाढ्य सत्तेला तोंड देणार्या. बेलवडीच्या देसायाची राणी आणि सोंडाच्या शिवाप्पा नायकाची बहीण आहे. एवढेच नाहीतर युद्धाची बातमी लागल्यावर शेजारील सिगेहळ्ळीचा विरप्पा गौडा आणि हुलीचा गवप्पा नाईक आपल्या फौजेसह राणीच्या मदतीला धावले होते.
नेमके काय घडले -
युद्धाच्या दरम्यान दादाजी किंवा मराठी साहित्यानुसार सखोजी गायकवाड याने राणीच्या घोड्याच्या पायावर वार केल्याने राणी खाली पडल्या हा युद्धशास्त्रानुसार त्यांचा अपमान आहे. हजारोची फौज आणि एका संस्थांनची राणी असणार्या मल्लम्माचा हा अवमान होता. काही असेल परंतु मराठी भाषिकांना आता बलात्कार या शब्दाचा वापर करू नये हा या ससंदर्भ लेखाचा उद्देश आहे.
कन्नड इतिहासकाराच्यामते सिद्धसमुद्र मठाधिपतींनी महाराजांना लोकुरच्या मंदिरात बोलावून दोघात समेट घडवून आणला. यावेळी विधवा राणीचा एक वर्षाचा मुलगा नागभूषण त्यांच्या पाठीवर असून राजेंनी ईशप्रभूच्या मृत्यूबाबत खेद व्यक्त करत त्यांना 40 गावची नव्याने जहागिरी देवून त्यांच्या राज्यकारभाराची व्यवस्था लावून दिली. म्हणूनच ज्या गावात युद्ध झाले त्या यादवाडमध्ये बेलवडीच्या महाराणी मल्लम्माराणीने शिवरायांचे पहिले शिल्प कोरून ठेवले आहे. ( Dr. satish kadam )
नोट – कर्नाटकातील बेलवडीच्या राणी मल्लम्मा आणि केळदी किंवा बेदनूरच्या राणी चन्नम्मा अशा दोघींनी आपापल्या भागात मंदिरासमोर छत्रपती शिवरायांचे शिल्प कोरून राजांचे स्थान निश्चित केले आहे.
@ prof.Dr.satish kadam

